औरंगाबाद: रिलायन्स जीयो या मोबाईल टॉवर कंपनीने मालमत्ता करापोटी मनपा प्रशासनाकडे नुकतेच सुमारे सव्वादोन कोटी रुपये जमा केले असल्याचे समजते. मार्च एंडिंग मध्ये देखील संबंधित कंपनीने सुमारे सव्वा कोटी रुपये जमा केले होते.
शहरात विविध ठिकाणी विविध मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारलेली आहेत. या मोबाईल कंपन्यांकडे मालमत्ता करापोटी मनपाचे कोटी रुपये थकले आहेत. ३१ मार्च रोजी शहरातील प्रभाग कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मोबाईल टॉवरच्या कर वसुलीची मोहिम राबवली होती. यात विविध मोबाईल टॉवर कंपन्यांकडून एकूण ४ कोटी ५४ लाख ९९ हजार ८४९ रूपयाचा कर केला होता. त्यावेळी नोडल अधिकारी शिवाजी झनझन व त्यांच्या पथकाने रिलायन्स जियो यांच्याकडून १ कोटी २६ लाख २० हजार १४५ रूपये व इंडस टॉवर यांच्याकडून ६ लाख ६० हजार २७२ रूपयाचा मालमत्ता कर वसुल केला. त्यानंतर आता पुन्हा रिलायन्स जीओकडून २ कोटी २७ लाख ६२ हजार ६६७ रूपयांचा कर वसुल करण्यात आला असल्याचे समजते. रिलायन्स जीयोचे शहरात एकूण ९७ टॉवर असून पैकी ८४ टॉवरचा कर त्यांनी भरलेला आहे.